स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्नीकुंडात ध्येयवेडी माणसे होती म्हणूनच स्वातंत्र्य मिळाले.-प्रकाश पाटील
कठोर मेहनत व परिश्रमाने विद्यार्थ्यानी धाडसाने पुढे या, ध्येयवेडे होऊन प्रयत्न करा, यश धावत येईल असे प्रतिपादन दैनिक सकाळचे निवासी संपादक प्रकाश पाटील यांनी श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये केले .यावेळी व्यासपीठावर बायफ संस्थेचे विभागीय अधिकारी जतीन साठे, संस्थेचे सचिव शांताराम काळे .देविदास आंधळे. उमेश मोरगावकर. सुरेश भांगरे, दत्ता भोईर ,आदिवासी उन्नती सेवा संस्थेचे उपाध्यक्ष सी.बी.भांगरे,प्रा मंजुषा काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 30 व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी असलेल्या प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पत्रकारिता क्षेत्रांमध्ये असणारी आव्हाने व समाजाची कामे केल्यानंतर मिळणारे समाधान याबद्दल भाष्य केले. तसेच ध्येयवेडे होऊन काम करा ,यश धावत येईल. स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्नीकुंडात ध्येयवेडी माणसे होती म्हणूनच स्वातंत्र्य मिळाले. विद्यार्थ्यांच्या या सोहळ्यामध्ये आल्यानंतर मलाही बालपणात गेल्यासारखे वाटले.मला माझी शाळा आठवली. शैक्षणिक जीवनातला आनंद वेगळाच असतो, तो पुन्हा मिळत नाही .विद्यार्थ्यांनी या आनंदाबरोबर सुजान नागरिक बना. स्वतःमधील शक्तिस्थाने ओळखा व मोठे बना. सावित्रीबाईंचा आदर्श घेऊन लढाऊ बना, असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बायफ संस्थेचे विभागीय कार्यकारी अधिकारी जितीन साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निसर्गाच्या शाळेत शिकणे फार महत्त्वाचे आहे, निसर्गाची शाळा फार काही देते. जीवनाच्या शाळेत कमी शिकले तरी चालते पण निसर्गाचे शाळेत अवश्य शिकले पाहिजे. राहीबाई पोपेरे यांचे उदाहरण देताना त्या शैक्षणिक शाळेत गेल्या नाही पण निसर्गाच्या शाळेत शिकल्यामुळे आज त्यांच्या घरी शाळा व विद्यापीठातील सगळे येतात असे सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकासोबत ज्ञान घेतले की त्याचा ज्ञान व अर्थार्जनासाठी निश्चित उपयोग होतो .जीवन समृद्ध करण्यासाठी शिक्षण घ्या. स्वतःबरोबर समाजातील घटकांचे जीवन देखील समृद्ध करा असे विचार त्यांनी मांडले. संस्थेचे सचिव शांताराम काळे यांनी प्रास्ताविकामध्ये उत्कृष्ट व उपक्रमशील शाळेबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ज्ञान व्याख्यानांमधून मिळते .पत्रकारितेमधील आदर्श व्यक्तिमत्वांकडून संपादकीय कौशल्ये, पत्रकारितेतील आव्हाने व समाधान विद्यार्थ्यांना कळणार असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले .यावेळी आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे उपाध्यक्ष सी.बी. भांगरे ,कौठवाडीचे सरपंच सुरेश भांगरे ,रमाकांत ढेरे, राजूशेठ पन्हाळे यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या शैक्षणिक गुणवत्तेचे, कलागुणांच्या विकासाचे वार्षिक पारितोषिक वितरण व्यासपीठावरील सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले .विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान, गणित प्रदर्शनामध्ये मिळविलेले घवघवीत यश, शाळेव्यतिरिक्त इतर स्पर्धांमध्ये मिळविलेली विविध पारितोषिके ,चित्रकला स्पर्धेमधील पारितोषिके वितरित करून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावी मधील आदिवासी दुर्गम भागातून येणारी कु. माया संजय बोटे हिला आदर्श विद्यार्थिनी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण भागवत, पाहुण्यांचा परिचय विनायक साळवे तर आभार शरद वाघमारे यानी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, पालक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा